Friday, November 12, 2010

माझे असे स्वतःशी- नाते अभंग आहे !

माझे न कोणी मजला - माझाच संग आहे
माझे असे स्वतःशी- नाते अभंग आहे !

आक्रोश थांबवा रे - टाहो नकाच फोडू
कोणत्या काळजाचा ठोका जिवंत आहे ?

समजावुनी स्वतः ला - आता एकंदरिने
मज हे ही पसंत आहे - मज ते ही पसंत आहे

हासू कसा जगाला ? - शहाणे कोण येथे ?
आरशात मीच मजला - कोठे पसंत आहे ?

त्यांना कसे कळावे ? - का ? "गाडले " पुरावे
मजला लुबाडणारा - लोकात "संत" आहे !

काटे असून येथे - अजुन फुल फूलते
जो तो म्हणे आताशा - चळला वसंत आहे !

का ? मारून मी स्वतः ला - जगलो असा कळेना !
अंता पर्यंत आता - दिगंत खंत आहे !

माझी कविता ... मयुरेश साने..दि २७-अगस्त-10

No comments:

Post a Comment