Sunday, November 20, 2011

जगा वेगळे मागणे मागतो मी...तरही


पडू दे जगाचा विसर घोकतो मी
जगा वेगळे मागणे मागतो मी
तुलाही अताशा कळू लागले की
तुला पाहताना मला पाहतो मी
चुका कोणत्या सांग मी माफ केल्या
मलाही कुठे मोकळे सोडतो मी
खरे बोलण्याचा तुला वीट येतो
जसे होत आहे तसे मांडतो मी
सलोखा कधीचाच केला दुखाशी
अता वेदनेशी कुठे भांडतो मी
मनी मोगर्‍याच्या स्म्रुती जागताना
तुझा होत जातो तुला माळतो मी
दिला जन्म देवा कशाला कळेना
असा विसर-भोळा कसा वागतो मी

जगणेच जणू गजरा गजरा


हसलास किती मज सांग जरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा

सुचतील मला तितक्या गझला
छळ ती ल मला जितक्या नजरा

जगणार किती मरणार किती
सुटली न कुणा बघ येरझरा

फसवे असणे फसवे नसणे
जगण्यात तुझा नखरा न खरा

सरणा वर ही दरवळ दरवळ
जगणेच जणू गजरा गजरा

मयुरेश साने...३०-औग-११

सांग गझले एकदा येईल का लिहिता गझल ?


सांग गझले एकदा येईल का लिहिता गझल ?

देवही विंगेत बसुनी पाहती ही नाटिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका

गप्प मी राहून ज्यांच्या घेतल्या पदरी चुका
ते तरी संतापले झालीच माझ्यावर टिका

पात्र परिचय देत जाती ओळखी येता जगी
भाउबन्की वाटते न संपणारी मालिका

मोकळे नाही तुझे हे हासणे कळते मला
हुंदके गाऊन गेले अश्रुच्या संगीतिका

का तरी उधळून देतो जिंदगी माझी अशी
जर मनापासून पटते जन्म ही शोकांतिका

वाटते आहे हवीशी जिंदगी अणखी मला
नेहमी हा जन्म ठरतो जीवघेणी प्रेमिका

सांग गझले एकदा येईल का लिहिता गझल ?
की फळा कोराच आहे जन्मभर नुसते शिका ?

...........................मयुरेश साने ३१- औगस्ट-११

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ?

कुठलाच होत नाही मुक्काम खास अजुनी
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ?

जपले फुलांपरी मी काटे परोपरीने
काट्यासही फुलांचा आहे सुवास अजुनी

मी हुंदक्यास माझ्या समजावले तरीही
का सूर जीवनाचा वाटे उदास अजुनी

आता हसून अश्रू देतात ही कबूली
सौख्यात वेदनेचा आहेच वास अजुनी

मथळा खुनीच आहे सुविचार हरवलेला
मी सोडतोच आहे कोरा समास अजुनी

कुठलीच वाट माझा मुक्काम होत नाही
वणवण मुशाफिराची हा बंदिवास अजुनी

आयुष्य शून्य होते आयुष्य शून्य आहे
माझ्या अपूर्णतेला आहेच ध्यास अजुनी

आयुष्य हे भुकेले उरते अशाच साठी
मृत्यूच जीवनाचा गिळतोय घास अजुनी

तात्पर्य जीवनाचे सुनसान लांब रस्ता
स्वप्नील सोबतीचा सत्यास त्रास अजुनी

मयुरेश साने..दि ..१०-१०-११

ओठी तुझ्या येईन का कधी मी उखाण्यासारखा ?

मागतो आहे तुला जरी मी दिवाण्यासारखा
ओठी तुझ्या येईन का कधी मी उखाण्यासारखा ?

वेडा बहर वेडी असोशी वेडेपिसे फुलपाखरू
एकटा वागू किती गं मी शहाण्यासारखा ?

एकदा सांगून जा ना जे तुला सांगायचे
हा तुझा रुसवा अबोला जीव जाण्यासारखा

दाद ही घेऊन गेले जीव घेणे थांबणे
दाटलेला हुंदका नाहीच गाण्यासारखा

तसबीर तू झालीस अन् तकदीर माझी संपली
आरसाही राहीला नाही पहाण्यासारखा

...मयुरेश साने..दि..२६- ऑक्टोबर-११

का गझल होत नाही फसवून ओळ जाते ?

लाऊन आस वेडी सुचवून ओळ जाते
शब्दास अर्थ काही देऊन ओळ जाते

दु:खातही सुखाच्या लिहितोय चार ओळी
मजलाच रोज माझी हसवून ओळ जाते

मुडदाड काळजाला सुचते कधी अचानक
चटका मनामनाला लाऊन ओळ जाते

लपवू नकोस अश्रू सांगून टाक सारे
तो हुंदका कुणाचा गाऊन ओळ जाते

उपरोध सांगणार्‍या हसर्‍या हुशार ओळी
हलकेच पापणीला भिजवून ओळ जाते

वाचून बातम्यांना पदरात काय पडते
घडणार जे उद्या ते घडवून ओळ जाते

सुचतो रदीफ मजला सुचतात काफियेही
का गझल होत नाही फसवून ओळ जाते ?

मयुरेश साने.

माझ्याच वेदनेला ठरवून जोक गेले

माझ्याच सांत्वनाला गाऊन श्लोक गेले
डोक्यास आठवांची देऊन खोक गेले

प्रेता परीच माझे जगणे जिवंत होते
मेल्यावरीच का मज जाळून लोक गेले

कवटाळतोय ज्यांना मानून फक्त माझे
हलकेच काळजाला पाडून भोक गेले

जगण्यास आज माझ्या भलतीच धार आहे
आभार मानतो जे काढून टोक गेले

हसण्या शिवाय आता आहे उपाय कुठला ?
माझ्याच वेदनेला ठरवून जोक गेले

मयुरेश साने

मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा


मी श्वास श्वास माझे केले तुझ्या हवाली
मुर्दाड जीवनाला माझी दया न आली
का वस्त्रहरण चाले सामान्य माणसाचे
जे फेडतात त्यांना मिळतात रोज शाली
मी पुण्यवान किंवा पापी म्हणा हवे तर
करवून तोच घेतो माझ्यात हालचाली
कोणी नसे कुणाचे पण सोबती हजारो
मधुनीच घेत जातो माझीच मी खुशाली
ओठात नाम देवा जेव्हा फुलून आले
काट्या - कुट्यातुनी ही अपसूक वाट झाली
हा आरसा बिलोरी वाटे मला नकोसा
तू लाज लाजता मी बघतो मलाच गाली
हासून वेदनेचे पचवा जहर सुखाने
गाऊ नका कधीही रडक्या उदास चाली
मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा
साधीच ओळ व्हावी संवेदनेस वाली
....मयुरेश साने...दि.२० -नोव्हेंबर -११

Saturday, August 6, 2011

ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू



बघ तुला तुझे छळेल लाजणे हळूहळू
ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू

गाळतेस तू मलाच टाळतेस बोलणे
मी तरी तुझे बनेन मागणे हळूहळू

आरसा नको बघूस तू मला बघून घे
झोप ही तुझी बनेल जागणे हळूहळू

सांग ना तुझ्याविना कसा जगू कसा मरू
आस अंतरात श्वास सांडणे हळूहळू

आत्म सूख लाभता तुला कळेल नेमके
धावणे तुझे बनेल रांगणे हळूहळू

आजही खुळा वसंत मागतो तुझी अदा
तो सुधा शिकेल आसु ढाळणे हळूहळू

एकदा मिठीतले सुगंध गीत ऐक ना
सोडशील मोगराच माळणे हळूहळू

मयुरेश साने .. दि .१९-जून-११

हळू हळू....



गांधिवाद खुंटिलाच टांगले हळू हळू
उपोषणेच वाटतात चोचले हळू हळू

सणासुदीत उत्सवात उसवले खिसे किती
जितेपणी कितीक पिंड पोसले हळू हळू

शिव्याच घालतो जरी राजकारणास मी
आरशात मी मलाच सोसले हळू हळू

भोगतोय मी सुखात बोचर्‍याच जाणिवा
सूख कसे मऊ निघेल बोचले हळूहळू

भूक राजकारणी - नाइलाज केवढा
शोशितांचेच रक्त शोशले हळूहळू

मयुरेश साने .. दि १८-जून-११

फुले वेचायला जाताच काटे बोचले होते..(गझल)



निरोपाच्या क्षणी डोळ्यात पाणी दाटले होते
मला माझ्याच अश्रूंनी असे गोंजारले होते

वसंता आजही नाही तुला जमले तसे फुलणे
फुले वेचायला जाताच काटे बोचले होते

जमेला घेत गेलो जी सुखाची वाटली नाती
दुखाच्या कारणांना मी खरे धुंडाळले होते

अता पाऊल पडते पावसाचे वाकडे तिकडे
तुझ्या गालावरी त्याचे ॠतू रेंगाळले होते

तुझ्या उमलून येण्याला मिळाला अर्थ गंधाचा
तुझ्या श्वासात थोडे श्वास माझे माळले होते

मयुरेश साने.. दि ..०३- जुलै-११

श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गाव मनोहर

श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गाव मनोहर
सुख दु:खांच्या रहदारीतील जीवन म्हणजे नुसती घर घर

मरून सुद्धा जिवंत राहते भूक कधी रे शमायची ही ?
मनातले मांडे खाण्याला अजून बाकी थोडे जर तर

चरित्र नायक लिहून गेले आत्मचरित्रात हेच आपल्या
खरे जगाया उशीर झाला मरून गेलो हळूच भर भर

ललाटि रेखाटून भुमीका श्वास श्वास मोजून बिदागी
मृत्यूच्या या नाटिकेत मी जगणे हे केवळ मध्यंतर

शोभिवंत या जगात माझे विचार ठरले जूनीच अडगळ
खोल खोल सोसून वेदना हसत मुखाने जगणे वर वर

मयुरेश साने..दि २९- जून -११ ...(तरही गझल)३२ मात्रांचे मात्रावृत्त

मनाची धाव चोहिकडे....



मनाचे ऐकुनी मुखडे
जगाला टाळले जिकडे

मनाच्या चावडी वर मी
कधी इकडे कधी तिकडे

प्रेम समजून घे माझे
शब्द पोचेल का ? तिकडे

तुझी तंद्री अशी हुकमी
अचुक नेतेच भलतिकडे

एकटी सावली आणी
बिचारे ऊन एकिकडे

इथुन गेली असावी ती
वळण बघ वाकडे तिकडे

मनाच्या दावणीला मी
मनाची धाव चोहिकडे

मयुरेश साने.. दि..२३- जुलै-११

काय होती वेदना आनंदण्याची कारणे....



जिंकण्याची कारणे की हारण्याची कारणे
काय होती वेदना आनंदण्याची कारणे

सहन ही होणार नाही स्पर्श हा माझा तुला
हो ! तशी नाजूक होती पेटण्याची कारणे

टाळते आहेस तू , पण ऐक ना माझे जरा
सारखी आहेत अपली जन्मण्याची कारणे

वादळे ओवाळली पण हारलो तुझिया पुढे
बघ विचारुन फुंकरीला तेवण्याची कारणे

एवढा अपराध केला आपले म्हटले तुला
आसवांना मिळत गेली वाहण्याची कारणे

वाकलेल्या पाहतो मी लाळघोट्यां च्या गुढ्या
ताठ होतो हीच माझ्या मोडण्याची कारणे

मयुरेश साने...दि...२८-जुलै-११

भावना स्पर्शातल्या तुज सांगना कळतील का ?

चांदण्या गगनातल्या बघ मोजता येतील का ?
भावना स्पर्शातल्या तुज सांगना कळतील का ?

चंद्र आहे कृष्ण आणी चांदण्या जणु गोपिका
एकमेकांवर कधीया चांदण्या जळतील का !

पारिजाता सारखा होकार यावा अंगणी
चांदण्या शब्दात माझ्या भावना फुलतील का !

चाहूल माझ्या चंद्रिकेची देत गेले कवडसे
हात तो हातात देण्या पाउले वळतील का !

चांदण्यांच्या अक्षता अन् पौर्णीमेची तोरणे
सूर्य ही श्वासात अपुल्या चांदणे शोधील का !

मयुरेश साने.. दि..३०-जुलै-११

मी जगाला भीत नाही

आसवे ढाळीत नाही
ही जगाची रीत नाही

हे असे चालायचे रे
काहिही विपरीत नाही

दुखः माझे स्वाभिमानी
चेहरा लपवीत नाही

रोज शिमगा चालतो जो
पेटत्या होळीत नाही

कतडी बघ राठ माझी
मी जगाला भीत नाही

सामर्थ्य एका लेखणीचे
डागल्या गोळीत नाही

फसवतो आहे (स) स्वताला
तू जगा फसवीत नाही

मानतो आभार तुमचे
सोयरी तजवीज नाही

मयुरेश साने..दि..६-औगस्ट-११

जुन्या ओळखीने नवे पेच झाले

नको वाटले नेमके तेच झाले
जुन्या ओळखीने नवे पेच झाले

मला सांगते तू बदलना स्वताला
तुझे वागणे ही मघाचेच झाले

उमेदीत घेतो जरी श्वास ताजा
तरी रोज जगणे उसासेच झाले

कुणी आज माझे नसे तर नसू दे
तुझे दोन अश्रू दिलासेच झाले

अता वर सुधा चालते वाटमारी
कसे पावसाळे उन्हाळेच झाले

जरी रोज आव्हान देतो उद्याला
तरी वायदे का तहाचेच झाले.

मयुरेश साने...दि...०७-औगस्ट-११

Monday, June 27, 2011

असा ताठ तोरा जिराफात नाही


तसा फारसा खोल आघात नाही
तुझा हूंदकाही ठरावात नाही
कुणाच्या मनाचा कसा ठाव घ्यावा
कसे हातचेही हिशोबात नाही
कशाने तुझ्या बेरजा होत गेल्या
विरुनी तुझ्या अठवणी जात नाही
सुन्या काळजाच्या किती पायवाटा
प्रवासी कुणीही प्रवासात नाही
उभा जन्म जाळून आरास केली
तुझी सावलीही निरोपात नाही
उपोशण करावे कुणीही कधीही
पुढारी बनूनी कुणी खात नाही
घरी बैसलेले कसे षंढ पाहू ?
कशी आज तरवार म्यानात नाही
तुझे मोगर्‍याचे हवे श्वास ताजे
तसा तेवढा मी सुवासात नाही
जरी रोज सत्कार केले फुलांनी
नशीबात माझ्या तुझा हात नाही
नको गुंतवू तू मनाला कुठेही
तुझ्या आतले भाव विश्वात नाही
मना ने मनालाच सन्मानितो मी
असा ताठ तोरा जिराफात नाही
मयुरेश साने..२२ जून ११

Sunday, June 19, 2011

ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू



बघ तुला तुझे छळेल लाजणे हळूहळू
ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू

गाळतेस तू मलाच टाळतेस बोलणे
मी तरी तुझे बनेन मागणे हळूहळू

आरसा नको बघूस तू मला बघून घे
झोप ही तुझी बनेल जागणे हळूहळू

सांग ना तुझ्याविना कसा जगू कसा मरू
आस अंतरात श्वास सांडणे हळूहळू

आत्म सूख लाभता तुला कळेल नेमके
धावणे तुझे बनेल रांगणे हळूहळू

आजही खुळा वसंत मागतो तुझी अदा
तो सुधा शिकेल आसु ढाळणे हळूहळू

मयुरेश साने .. दि .१९-जून-११

Thursday, June 9, 2011

गे कविते....!!!



मोकळा मी लेखणीशी होत जातो
अन् कविता मोकळी होऊन जाते

शब्दही होतात मग् इतके अनावर
अन् कविता अर्थ त्या देऊन जाते

घेरतो जेव्हा मला काळोख मनीचा
अन् कविता चांदणे माळून जाते

वाळवंटा सारखा मी कोरडा
अन् कविता येऊनी भिजवून जाते

कुठल्या वसंताने दिले वरदान हे
अन् कविता कागदी बहरून जाते

रोज वठलेल्या मनी येते कविता
मन् मनाची पाकळी फुलवून जाते

गे कविते! साथ तू देशील ना
अन् कविता लाजरी होऊन जाते

मयुरेश साने ... दि .. २४ -एप्रिल- ११

असे झाले तसे झाले............



असे झाले तसे झाले रडू आले हसे झाले
जसे झाले तसे झाले व्यथांचेही ठसे झाले

उन्हाचे शाप सोसूनी सुखाची सावली आली
तुला चोरून बघताना मनाचे कवडसे झाले

वजाबाकी जमेची हीच आयुष्यातली बाजू
सुखाची मर्तिके झाली दुखाचे बारसे झाले

जरा विश्वास ठेवा घात हा अपघात नसतो हो
अचानक होत जावा त्याचसाठी भरवसे झाले

कितीदा संशयाने तोडते काळीज तू माझे
उभे आयुष्य तुजसाठी बिलोरी आरसे झाले

मयुरेश साने... दि..२३ अप्रील ११

माणसे प्रेतापरी पाहू कशाला ?...



उधळले आहेच मी आयुष्य माझे
दान पडलेले तरी पाहू कशाला ?

मनगटे असता इथे शाबूत माझी
रांग पंथांची तुझ्या पाहू कशाला ?

कोणत्या काळात मी जगलो कळेना
मी कुणाची आसवे पाहू कशाला ?

स्वाभीमानी रक्त माझे सळसळे
मी कुणाची पायरी झिजवू कशाला ?

सोबती आहे मला अस्तित्व माझे
माणसे प्रेतापरी पाहू कशाला ?

मयुरेश साने... दि...२९ -अप्रिल-११

गच्च ओली भेट होती

चिंब ओल्या श्रावणाची गच्च ओली भेट होती
कुंपणाशी रंगलेली रान हिरवी ठेच होती

कोरडे होते परंतू कोडगे नव्हतेच अंबर
कोकिळेच्या सुस्वराची सादही दिलखेच होती

लख्ख गोर्‍या गोमटीचा दागीना अनमोल होता
वीज ती तेजाळणारी हिरकणी शिरपेच होती

माझ्या मनाच्या अंगणाशी बरसूनी पाऊस गेला
शिंपली चाहूल होती मोतीयांची वेच होती

कोवळ्या सुकुमार कांतीचे कुठून से ऊन आले
उमलते जी मन्मनी माझी प्रिया तेथेच होती.

मयुरेश साने... १८- मे-११

गुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा



लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा

का असा खुळ्यापरी तुलाच रोज पाहतो
पाहतो मलाच मी जरा जरा जरा जरा

सांग काय टाळतात गूज ओठ बोलके
तू जशी तसाच मी जरा जरा जरा जरा

येतसे कसे मला भरून आज एवढे
वाहता झराच मी जरा जरा जरा जरा

केतकी मनात मी सुगंध गीत गाइले
रान केवडाच मी जरा जरा जरा जरा

माप टाक होउ दे शकून मेंदिचा खरा
शांत चौघडाच मी जरा जरा जरा जरा

मयुरेश साने..दि २१- मे-११

तुला कधी कळेल का ? (गझल...)



उमलते मनात ते तुझ्यात दरवळेल का
अबोल गीत प्रितीचे तुला कधी कळेल का ?

शब्द शब्द जुळवुनी फुले बरीच गुंफली
तुझ्या मनात सांगना वसंत सळसळेल का ?

बटेस सावरु नकोस गुंतुदे मला जरा
मला बघून मोगरा पुन्हा पुन्हा जळेल का ?

जशी खुले कळी तशी तुझी खुले खळी
तसे हसून मोकळे नशीब फळफळेल का ?

अधीर होउनी सदा तुझीच वाट पाहतो
अधीरता क्षणातली तुला कधी छळेल का ?

तुला स्मरून मैफलीत सूर लावतो अता
तसाच सातजन्मी सूर आपला जुळेल का ?

विचारणार तोच ! प्रश्न... शोधतात उत्तरे
प्रश्न उत्तरात जन्म सांग घुटमळेल का ?

मयुरेश साने..२७ - मे -११

गझलेत दुखः माझे चिणणे अजून बाकी

आहेत श्वास चालू जगणे अजून बाकी
मरतोय रोज माझे मरणे अजून बाकी

फुलवात जीवनाची जळते उगाच का रे
जळतोय रोज माझे विझणे अजून बाकी

मनमोकळे पणाने का हासलो कळेना
पुरते मला समजले रडणे अजून बाकी

मुडदाड माणसांना मी भेटतो कशाला
उसवून काळजाला शिवणे अजून बाकी

कविता निघे अनावर घेऊन आस वेडी
गझलेत दुखः माझे चिणणे अजून बाकी

मयुरेश साने ...दि २८- मे -११

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले...(गझल)



हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले
सावरले मी किती मनाला, जडू नये ते जडून गेले

नाईलाज तरी किती म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू नये ते सडून गेले

तसे इशारे कळले होते तुला सुधा अन् मला सुधा पण
नाव तुझे ओठातच माझ्या दडू नये ते दडून गेले

नवसालाही पावत होता तरी उपाशी विठूच होता
भक्त कुठे ही नव्हता ! पाया पडू नये ते पडून गेले

विश्वासाची बात नको रे ! गळा कापतो केसाने
काय सांगू मी ! कलीयुगीया नडू नये ते नडून गेले

सोपे साधे कधीच नसते गणीत किचकट जगण्याचे
सुटेल म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये ते अडून गेले

मयुरेश साने .. दि ३०- मे-११

पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला...



पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला
पतंग नसताना ज्योतीने जीवन जाळायचे कशाला

सावलीतले भास उशाशी नको नको ते चंद्र चांदणे
पोळुन निघतो चांदण्यात मी ऊनही टाळायचे कशाला

काटेरी नशीबाला घेउन काटा जपतो हळूवार मन
कोमेजुन जाताना कळते कुंपण वाळायचे कशाला

फुटलेल्या काचेत विखुरला प्रेम तुझ्यावर करणारा
आरशात मी मला दिसेना इतके भाळायचे कशाला

प्रमाणपत्रे देउन जातील अर्थ का कधी जगण्याला
मनातुनी ओठावर येते पुस्तक चाळायचे कशाला

मयुरेश साने ...३१- मे -११

ह्रुदयाचा हुंकार गझल.........



प्रतिमेचा श्रुंगार गझल
प्रतिभेचा झंकार गझल

प्रेतापरी जगतात माणसे
धगधगता अंगार गझल

शोभेचा दागिना नव्हे हा
पूजनालंकार गझल

फुंकर जखमांवरती अलगद
ह्रुदयाचा हुंकार गझल

आंदण माय मराठी देते
मातीचा संस्कार गझल

कृष्ण सावळ्या मनात माझ्या
बिजलीचा संभार गझल

चित्कार गझल हळुवार गझल
मी करतो वारंवार गझल

सरस्वती मातेच्या ओठी
अनादि अपरंपार गझल

मयुरेश साने ... दि ४ जुन ११

अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही



अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
कोठे कधी कुणाला कळतात माणसे ही

गर्दीत माणसांच्या माणूस हरवलेला
मदतीस हाक मारा पळतात माणसे ही

धर्मार्थ आज सांगे जाते घरोघरीचे
जात्यात माणसाला दळतात माणसे ही

खांद्या वरून नेती माणूसकी स्मशानी
लुटण्या मगज मढ्याचा वळतात माणसे ही

नवसास पाव‍णार्‍या देवास ही कळेना
कुठल्या क्षणी अचानक चळतात माणसे ही

आयुष्य हेच डबके डुंबा बुडा मरा रे
गंगेतही अताशा मळतात माणसे ही

मयुरेश साने ..२० मे ११

Sunday, March 20, 2011

शब्द माझे सोबती झुंजार मी

संकटे येताच त्यावर स्वार मी
घेतली नाही कधी माघार मी

पाहती उंचावुनी मज अंबरे
घेतला मातीतुनी आकार मी

कर्मभूमी हीच माझी पंढरी
घेतगेलो रोकडा जोहार मी

थंड रक्ताची कशी ही माणसे ?
धुमसता राखेतला अंगार मी

दुख माझे हासुनी सांगे मला
सोबती झालास तू सौख्यात मी

रूप ते होते कुणाचे सांग ना ?
रोज केला आंधळा श्रुंगार मी

मोकळा स्वच्छंदि मी माझ्यातला
या जगाशी पाळतो व्यवहार मी

लेखणी नाही अरे बंदूक ही
शब्द माझे सोबती झुंजार मी

मयुरेश साने..दि..१७-मार्च-११

शून्य मी ! तरी मलाच भागतेस का ?

सांगना पतंग आज मागतेस का ?
कंदिला समान रोज जागतेस का ?

जायचा असाच जन्म संशयामधे
बोलतेस तू ! तसेच वागतेस का ?

हातच्याच कंकणास सावरून तू
आरशा समोर तोफ डागतेस का ?

वाहिले तुलाच श्वास प्रश्न हा छळे
सातजन्म सांग कोण लागतेस का ?

हातचे असून मीच वगळले इथे
शून्य मी ! तरी मलाच भागतेस का ?

मयुरेश साने..दि..१९-मार्च-११

Friday, March 11, 2011

थेट माझ्या सारखा तो कोण होता?


सारख्याशी सारखा तो कोण होता?
थेट माझ्या सारखा तो कोण होता?

पाच वर्षे व्हायची नाहीत कामे
पाय धरतो सारखा तो कोण होता

चेहरा माझा जरा पाहून घे तू
आड येतो सारखा तो कोण होता?

जीवना रे सांग ना मेल्यावरी ही
जन्म घेतो सारखा तो कोण होता?

वाट वळणाची तसे आयुष्य माझे
पायवाटे सारखा तो कोण होता?

मयुरेश साने ...दि..११-मार्च-११

तू दिलेला तो दगा ही खास होता...


जीवनाचा का मला हव्यास होता ?
घेतलेला श्वास ही गळफास होता

राम होता रावणा मारावयाला
जानकी चा सोबती वनवास होता

दाखले संपायचे नाही कधीही
वर्तमानाचा नवा इतिहास होता

भेटली नाही कधीही ती तरीही
भेटल्याचा रोजचा आभास होता

स्वर्ग नर्काचे उखाणे दूर ठेवा
सोडला मी श्वास तो बिन्धास होता

जीव जाण्याची जरी होती निमीत्ते
तू दिलेला तो दगा ही खास होता

मयुरेश साने..दि..८-मार्च-११

जरासे हसूनी बरे वाटले


जरी आसवांनी पुरे गाठले
जरासे हसूनी बरे वाटले

तुझी रोज जपली बिलोरी छबी
तुझ्या आरशाला चरे वाटले

जिवापाड प्रेमात असुनी तुला
जिवे संपल्यावर खरे वाटले

उभा जन्म ठेचाच खाऊनही
नदीने सुखाचे झरे वाटले

क्षणांची मिठी श्वास श्वासातुनी
मनालाच मन धावरे वाटले

मयुरेश साने...१० -मार्च-११

का गं घातलास धपाटा ?


मला पण बाबा सारख
ऑफिस ऑफिस खेळायचय
रोज लवकर येतो सांगुन
रोज त्याला गंडवायचय

नको ना गं शाळेचा
तू सारखा पाढा वाचू
थांब थोडा वेळ
देना गाऊ खाऊ नाचू

दादाला कस्सं कधी कुण्णी नाई बोलत
नवीन मुली असतात त्याच्या अवती भवती डोलत

ताईचा तर अस्सा मला राग येतो आहे
"तो" देतो क्याड्बरी ...म्हणते मला आणली आहे

समजू नका मला लहान मी तर आहे मोठ्ठा
आईईईईग् आई आई !!!! का गं घातलास धपाटा ? का गं घातलास धपाटा ?

मयुरेश साने ....दि ०६-०३-11

Sunday, February 27, 2011

जिंकलो होतो इथे अन्-बघ कुठे सत्कार झाले..

दुखः आता फार झाले
जिवनाचे सार झाले

वाटले होतील माझे
तेच होते ठार झाले

पाशवी त्यांच्या मढ्याचे
लाघवी संस्कार झाले

तू मला चंदा म्हणाली (स)
चांदण्याचे वार झाले

आसवे येतात इतकी
हासणे ही भार झाले

भेट झाली वाळवंटी
सूर्य सारे गार झाले

वेतनाची वाढ कुठली ?
वाढते खिंडार झाले

संपन्न जितका होत गेलो
शत्रुसारे यार झाले

जिंकलो होतो इथे अन्
बघ कुठे सत्कार झाले

मयुरेश साने..दि..२७-फेब-११

प्रेमभंग...

रोज का जळे पतंग ?
ज्योतिचा विखार संग

बुडलो प्रेमात तुझ्या
उरला नुसता तवंग

स्म्रुती गहिरा डोह तुझा
माझा उठतो तरंग

मारुन थापा भजनी
बोलतो खरा म्रुदंग

पुनवेची रात असे
सूर्याचा प्रेमभंग

उरलो राखेत तरी
आत्मा तुझियात दंग

प्रेमाची वीण विणु
उसवोनी अंग अंग

भ्रमराचा अंत असे
मिटत्या कमळात गुंग

मयुरेश साने..दि..०७-जानेवारी-११

तुझा दोष नाही

तुझा दोष नाही गुन्हा मीच केला
पुन्हा प्राण माझा दग्यानेच गेला

नको चांदण्याचे उशाला उखाणे
सदा जागुनी सूर्य डोळ्यात गेला

तुझ्या सौख्य हास्यात आनंद आहे
मला कोणता काळ जगवून गेला

मला सोबतीला सुन्या पायवाटा
वरातीत मेण्या तुनी जीव गेला

दिले गीत माझे तुझ्या मैफलीला
तुझा हुंदका दाद घेऊन गेला

मयुरेश साने .. दि...०२-फेब्रुवारी-११

विमान माझे तयार होते !

खरेच का ? चांदणे तुझे- ते - मला कधी भेटणार होते !
हजार वणवे उरात माझ्या - चितेवरी पेटणार होते !

"समाज भिंती " सपाट करुनी - जरा तुझ्या अंगणात आलो !
नव्या नव्या तोरणात नटले - मला तुझे - बंद दार होते !

तुला दिली "ती" ! फुलेच नव्हती - "ऋतु - ऋतुंचे सवाल" होते !
अनेकदा "मोहरुन" गेलो - हवे हवेसे - नकार होते !

हसून देईन कारणे - का ? रडावयाला उशीर झाला !
"सऋद्य" जे वाटले तयांचे - जिवंत ठोकेच ठार होते !

* ( "सऋद्य" - सर्‍हुदयी - संवेदनशील- भावनाप्रधान )

जिवंत होतो -जगून गेलो - मरावयाला जिवंत आहे !
विसंबुनी राहिलो कसा ? मी - तिने दिले "शब्द चार" होते !

सुळावरी दे मला ! तरीही इमान माझे प्रमाण आहे
"तुका" ! "विठोबा" उभे कधीचे - विमान माझे तयार होते !

.............मयुरेश साने....दि...९-फेब-११

बोलू नकोस काही..........

बोलू नकोस काही - समजून घे इशारे !
ये ना मिठीत माझ्या ! दे अंगावरी शहारे !

रेंगाळते कशाला ? ये ना ! निघून आता !
विझवून जा उरीचे - ते श्वास पेटणारे !

अत्ता मला समजले का ? फुलती कळ्या खुळ्या !
भेटीस सज्ज अपुल्या झाले गुलाब सारे !

चंद्रा तुला आता मी - दावेन पौर्णिमा !
म्हणशील "कोजागिरी" ला - "पेटते निखारे" !

आल्या नटून रात्री - बेधुंद गार वारा !
डोळ्यास पापणीचे - बघ जागते पहारे !

.............. मयुरेश साने ...दि.१२-फेब-११

कोणता जन्म इथे सांग ???

कोणता जन्म इथे सांग - हासण्यासाठी ?
घेतले श्वास "मी" - जिवंत - भासण्यासाठी !

ओळखीचेच कुणी आज मला भेटावे
ओळखीचाच मिळो फास - संपण्यासाठी !

रे ! वसंता मला नकोत फुलांच्या हाका
चाललो मी इथे - मुळी न थांबण्यासाठी

माळ माझेच ह्रुदय - मोकळ्या केसांमधुनी
जीव उरला कुठे तुझ्यात गुंतण्यासाठी !

कोणता शब्द तुला देऊ सखे सांग मला ?
दोन डोळे दिलेत प्रेम उमजण्यासाठी

व्रण झालेत जुने वेदना तरीही नवी
अश्रु येती अजून प्रेम सांडण्यासाठी

मयुरेश साने..दि...१६-फेब-११

कोणता जन्म इथे सांग ???

कोणता जन्म इथे सांग - हासण्यासाठी ?
घेतले श्वास "मी" - जिवंत - भासण्यासाठी !

ओळखीचेच कुणी आज मला भेटावे
ओळखीचाच मिळो फास - संपण्यासाठी !

रे ! वसंता मला नकोत फुलांच्या हाका
चाललो मी इथे - मुळी न थांबण्यासाठी

माळ माझेच ह्रुदय - मोकळ्या केसांमधुनी
जीव उरला कुठे तुझ्यात गुंतण्यासाठी !

कोणता शब्द तुला देऊ सखे सांग मला ?
दोन डोळे दिलेत प्रेम उमजण्यासाठी

व्रण झालेत जुने वेदना तरीही नवी
अश्रु येती अजून प्रेम सांडण्यासाठी

मयुरेश साने..दि...१६-फेब-११

वादात या कुणीही सहसा पडू नये !

माझ्याच आरशाला "मी" आवडू नये ?
वादात या कुणीही सहसा पडू नये !

हासून हुंदक्यांना मी टाळले जरी
काहूर आसवांचे दडता दडू नये ?

जेव्हा फुला प्रमाणे - स्पर्शेन मी तुला !
काटा बनून कोणी तेव्हा नडू नये !

येऊ नकाच कोणी - मागायला मते !
दारात दु:खीतांच्या कोणी रडू नये !

आश्वासुनी "उद्याला" जे श्वास घोटती !
(त्यांचे कुठे कधीही काही अडू नये ?)

मयुरेश साने..दि..१७-फेब-११

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला....

श्वास माझे सांगती , "मी"- पाहिजे थांबायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

पाहिले होते तुला आलीस मग स्वप्नात तू
स्वप्नपुर्ती ध्येय झाले लागले जागायला

घेतले जेव्हा कडेवर "पांगळे" से दुखः मी
ते पहा ना ! सूख माझे लागले रांगायला

लागला मतितार्थ गीतेचा मला "तो" - हा - असा
भोग सारे भोगतो मी ! "या जगातच" यायला

आरसा पाहून घे ! तू - पत्रिका पाहू नको
शेवटी होतेच "ते" - वाटे - नको ! "जे" व्हायला

कायद्याची थोरवी कोणीच नाही गायली
कायद्याच्या आडवाटा लागल्या सांगायला

मयुरेश साने...दि..१८-फेब-११

हवा कशाला ? - "valentine"


न मी - कुणाचा "valentine"
न कोणी -माझा "valentine"
असाच मी - "OK ! FINE !"

"valentine" - "valentine"
हवा कशाला ? - "valentine"

मराठ मोळा ! "प्रेम - वीर" मी !
मनामनावर करतो - "Sign"

"तिळगुळ घ्या" -अन्- "गोड गोड "बोला
हवा कशाला ? - "valentine"

"valentine" - "valentine"
हवा कशाला ? - "valentine"

"प्रेम" म्हणजे - नशा नव्हे रे !
नको पिऊ ही -"फडतुस"- "Wine"

"विश्वची "माझे - "घरकूल" व्हावे !
"पसायदान" - मी -वाचत जाईन !

"valentine" - "valentine"
हवा कशाला ? - "valentine"

....मयुरेश साने...दि...१३-फेब-११

सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी...

पौर्णिमा नको मला अजून चांदण्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी

आत्म बोध दे मला नकोत श्वास खेळते
घेतले कितीक जन्म व्यर्थ "मी" पणात मी

शोधती तुला मला उगाच या दिशा दिशा
भेटतो तुला अता मनातल्या मनात मी

का ? वठूनही मनास पालवी फुटे नवी
पाहतो तुझे ह्रुतू असून कुंपणात मी

या मुळे तरी मिळेल दाद मो़कळी मला
कोंडले तुलाच आज मोकळ्या स्वरात मी

...... मयुरेश साने..दि...१९-फेब-११

तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे


तुझ्याच साठी जगायला का ! मरायला ही तयार आहे !
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

उत्पत्ती अन् स्थिती लयाचा - कलीयुगाचाच खेळ सारा
"अ" कार झाला - "उ" कार झाला - महेश्वराचा "म" कार आहे

खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला नभातून शुक्र तारा
कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे

मनातुनी खोल साद येते - रडू नको रे ! - रडू नको रे !
कुणीच नाही इथे कुणाचा - तुझाच तू शिल्पकार आहे

तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार आहे

गणीत कोणा कसे सुटावे ? उगाच यावे - उगाच जावे !
पुन्हा पुन्हा या जगी मराया तशी शिदोरी चिकार आहे

मयुरेश साने..दि..२३-फेब-११

ठरेन या जगात मी महान एकदा तरी


ठरेल हे भविष्य वर्तमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

तुम्हास ही कळेल कोण हारले खरे इथे
असेल जर खरे खुरे इमान एकदा तरी

लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा जिथे
हसून वाचशील तेच पान एकदा तरी

मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी

निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी

हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी

मयुरेश साने..दि..२५-फेब-११

Thursday, January 27, 2011

"दंगा नका करु"

"दंगा नका करु" हे -नारेच थोर होते
"पोलीस" वाटले ते - सारेच "चोर" होते

निर्दोश सिद्ध झाला - आता "बलातकारी"
लाजून बोलला तो- "वारे छछोर होते"

आकाश चुंबिणारा "आदर्श"घोळ होता
त्यांच्या सदा ललाटी -तारे टपोर होते

आशा नको धरु रे! "गीतार्थ" माधवाचा
जे गोड वाटले ते - खारेच बोर होते

अत्ताच पेटुनी ते - संतापले तरीही
हाती नुरेच काही - "पारेच" दोर होते

मयुरेश साने...दि...१९-जानेवारी-११

शहारा...


तुला रोज येतो कधीही शहारा
कसा सांग व्हावा ? नशेचा उतारा

किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा

बिछाना च होईल आकाश गंगा
तु ये ना जरा लाजवू शुक्र तारा

उभा जन्म काट्यात आहे तरीही
तुझी आस आहे सुगंधी फुलोरा

जरी अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा

अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा

...मयुरेश साने..दि...२६-जानेवरी-११

शिळा घास होता


खरा कायदयाने मला फास होता
कुठे न्याय ? तो फक्त आभास होता

तराजू कधी पावला सांग त्यांना ?
उभा जन्म ज्यांचा शिळा घास होता

लुबाडून खाती सदा तूप-रोटी
गुन्हेगार तेथेच हमखास होता

अरे ! कायद्या काय देऊ पुरावे ?
दलालीत वाटा तुझा खास होता

तुझ्या चोर-वाटां मुळे न्याय मेला
फरारी च आरोपि सर्रास होता

अशा कायद्याला कुणी भीक घाला ?
स्वतः न्याय केला ! सुरा पास होता

मयुरेश साने..दि..२२-जानेवारी-११

राजरस्त्याची पायवाट

मज निघायाला हवे
पायवाटांच्या सवे
साथीला आहेत मझ्या
रान पक्षांचे थवे

पावलांशी रंगलेल्या
कंटकांच्या गूज गोष्टी
शब्द ओठातून फुलती
रान गीतांचे नवे

दुड्दुड्त्या पावलांनी
भेटायला आला झरा
सांत्वना देती मला
रानावनांची आसवे

रातकिड्यांच्या मैफलीला
गंधवेडी रातराणी
काजव्यांनी दाद देता
पेटले लाखो दिवे

ऐकतो टाहो
पाहतो राज- रस्त्या चे तडे
माहेर पाऊल वाटेचे
वाटते त्याला हवे.

मयुरेश साने..दि..२३-जानेवरी-११

असा मी "असामी"

असा मी ! कसा मी ? कुठेही कसाही
 कुठेही कसाही

मला पाहताना किती लाजशी तू
तुझा आरसा मी कुठेही कसाही

तुझ्या कंकणी नाद मझाच येतो
तुझा भरवसा मी कुठेही कसाही

मुका शब्द होतो तु येता समोरी
तसा बोलका मी कुठेही कसाही

जरा स्पर्शु दे ना ! तुझे चांदणे हे
तुझा कवडसा मी कुठेही कसाही

फुला सारखी तू सदा गंध वेडी
सुना उंबरा मी कुठेही कसाही

सखे सोबतीला मला साथ देतो
तुझा भास नेहेमी कुठेही कसाही

मयुरेश साने...दि...२१-जानेवरी-११

Thursday, January 13, 2011

जागलेली रात...

आसवांचे सूर ओल्या पापण्या गातात आता
माझिया डोळ्यात आहे जागलेली रात आता

चांदणे आलेच नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या शब्दात आता

कोणता कंदील लावू जिंकण्या काळोख येथे ?
काजळी होते दिव्याची पेटणारी वात आता

मोगरा नाही तुझा मी तू मला माळू नको ना
वादळे का मागशी तू मोकळ्या केसात आता ?

सोसतो मी वार सारे आपुलाले - वेगळाले
वेदनेला भाव आहे कोणत्या घावात आता ?

मयुरेश साने...दि...१३-जानेवारी-११

Sunday, January 2, 2011

नवे साल गाणे जुने गात आहे....


जुना मी तरीही नवी बात आहे
जुन्या चंद्रम्याची नवी रात आहे

तुझा चंद्र नाही तुझ्या बाहुपाशी
सदा राबता मी हापीसात आहे

काळोख आहे आता ही उद्या ही
जुन्या कंदीलाची नवी वात आहे

किती काळ दु:खात ऐसे रडावे
नवे हासणे अन् जुनी कात आहे

अशी गोड वचने देउ नको ना
नवे राहू दे ! गं- जुने खात आहे

संकल्प लिहिले जुने - ते नव्याने
बोलाची कढी बोलाचाच भात आहे

अरे ट्रेन नाही रवीवार आहे
कडी पकडण्याला पुढे हात आहे

जगावे कशाला कुणाला कळेना
हप्ता विम्याचा तरी जात आहे

मयुरेशला सांगुनीही कळेना
नवे साल गाणे जुने गात आहे.

मयुरेश साने...०१-जानेवारी-११

जगावे कसे ?...........


इथे पुण्य पापातुनी जन्मलेले
निरप्राध सांगा ठरावे कसे ?

वडवानळाचाच भाऊ किनारा
तारु किनारी तरावे कसे ?

बरळून त्यांनी चुका रोज केल्या
मुका रोज तरी मी चुकावे कसे ?

इथे पूर डोळ्यातुनी सांडताना
कंठातुनी गीत गावे कसे ?

इथे चंदनाने दिली गंधवार्ता
संपून ही मी ऊरावे कसे !

नमस्कार करता मला बोध होतो
दुभंगुनही मी जुळावे कसे !

इथे एक वेडाच सांगून गेला
शोध घेण्या स्वत: चा हरावे कसे !

जिथे पिंजरा - खास आभाळ आहे
तिथे स्वैर भावे उडावे कसे ?

न्याय होईल केव्हा ? आरोपी पळाला
पुरावे आता सापडावे कसे ?

मयुरेशला एकदा सांग बाप्पा !
आजन्म मरण्या जगावे कसे?

मयुरेश साने... दि.२३-डिसेंबर-१०

Saturday, January 1, 2011

अश्रूस कळले या पुढे - या पापण्या भिजवू नये.....


मी तुला शोधीत आहे
तू तुला हरवून ये
मी साज झालो मैफिलीचा
तू मला गाऊन ये

चंद्र ही डोकावतो बघ
पाहण्या कोजागिरी
रोजचा गजरा नको
तू चांदणे माळून ये

आसवांची तोरणे अन
लोचनी मुंडावळ्या
थांबू नको त्या ऊंबर्‍याशी
ये माप ओलांडून ये

समजावूनी गेली मला
तो वार वर्मी लागला
अश्रूस कळले या पुढे
या पापण्या भिजवू नये


परतणे नाही आता
दे भेट साता - जन्मिची
कवळण्या मयुरेशला
सार्‍या जगा विसरून ये

माझी कविता...मयुरेश साने..दि.१२ डिसेंबर १

अबोला गाजला होता.....


तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता

तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता

जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता

तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता
चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता

असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना
घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता

मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला
असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता.

मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०

मयुरेश अजुनी ताठ आहे....


शालीन इतका पात्तळाचा काठ आहे
रोज नवख्या वादळाशी गाठ आहे

सांत्वनाच्या पावसाने गांजलेला
रोज फुटणारा व्यथेचा माठ आहे

माणसाचा मामला नाही अताशा
रोज फुलती पालवी ही राठ आहे

कायद्याचे कलम "हापूस" खाते
गांजल्यांना "पायरी" ची बाठ आहे

लावणीचा नाद सरता सरेना
किर्तनाचा रोजचा परिपाठ आहे

वाकण्याचा पिंड आहे गांडुळांचा
मोडण्या मयुरेश अजुनी ताठ आहे

..........मयुरेश साने....२७-डिसेंबर-१०

मयुरेश अजुनी ताठ आहे....


शालीन इतका पात्तळाचा काठ आहे
रोज नवख्या वादळाशी गाठ आहे

सांत्वनाच्या पावसाने गांजलेला
रोज फुटणारा व्यथेचा माठ आहे

माणसाचा मामला नाही अताशा
रोज फुलती पालवी ही राठ आहे

कायद्याचे कलम "हापूस" खाते
गांजल्यांना "पायरी" ची बाठ आहे

लावणीचा नाद सरता सरेना
किर्तनाचा रोजचा परिपाठ आहे

वाकण्याचा पिंड आहे गांडुळांचा
मोडण्या मयुरेश अजुनी ताठ आहे

..........मयुरेश साने....२७-डिसेंबर-१०