Sunday, February 27, 2011

तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे


तुझ्याच साठी जगायला का ! मरायला ही तयार आहे !
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

उत्पत्ती अन् स्थिती लयाचा - कलीयुगाचाच खेळ सारा
"अ" कार झाला - "उ" कार झाला - महेश्वराचा "म" कार आहे

खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला नभातून शुक्र तारा
कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे

मनातुनी खोल साद येते - रडू नको रे ! - रडू नको रे !
कुणीच नाही इथे कुणाचा - तुझाच तू शिल्पकार आहे

तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार आहे

गणीत कोणा कसे सुटावे ? उगाच यावे - उगाच जावे !
पुन्हा पुन्हा या जगी मराया तशी शिदोरी चिकार आहे

मयुरेश साने..दि..२३-फेब-११

No comments:

Post a Comment