Sunday, June 3, 2012


मागतो आहे तुला जरी मी दिवाण्यासारखा
ओठी तुझ्या येईन का कधी मी उखाण्यासारखा ?
वेडा बहर वेडी असोशी वेडेपिसे फुलपाखरू
एकटा वागू किती गं मी शहाण्यासारखा ?
एकदा सांगून जा ना जे तुला सांगायचे
हा तुझा रुसवा अबोला जीव जाण्यासारखा
दाद ही घेऊन गेले जीव घेणे थांबणे
दाटलेला हुंदका नाहीच गाण्यासारखा
तसबीर तू झालीस अन् तकदीर माझी संपली
आरसाही राहिला नाही पहाण्यासारखा
...मयुरेश साने..दि..२६- ऑक्टोबर-११

का पुन्हा येथे मरावे लागते
जर पुन्हा येथेच यावे लागते
नेमका येतो तुला भेटायला
अन् तुला तेव्हा निघावे लागते
काय आयुष्यात आहे आपले
सारखे माझे म्हणावे लागते
आठवांचा दाटतो पाऊस तेव्हा
हुंदक्यांचे गीत व्हावे लागते
खळखळूनी हासण्यासाठी सुधा
आसवांना गोठवावे लागते
पण मुखवट्याला जपावे लागते
तेव्हा विधात्यालाच यावे लागते
देव म्हणजे क्रूर काळ्या पत्थराला
जन्मभर काळीज द्यावे लागते

मखमली काटे जणू फुलवून जाते
हाय ती जेव्हा अशी लाजून जाते
मी रिकामा व्हायचो नाही कधीही
तीच उरते तीच ओसंडून जाते
दार करतो आठवांचे किलकिले मी
ती मनाचे कोपरे उजवून जाते
लांबतातच सावल्या बघ सांजवेळी
सावलीला हाक मारून ऊन जाते
दोन श्वासांचीच पडते आहुती पण
जन्मभरिची वासना पेटून जाते
........मयुरेश साने...११- मार्च-२०१२

शब्दातुन तू साकारावे असे वाटले
सहज बोलके गीत लिहावे असे वाटले
तुझा अबोला मला मुळीच न परवडणारा
तरी पुन्हा तू तसे रुसावे असे वाटले
आठवणींना देउन गेलीस तुझाच चेहरा
पुन्हा पुन्हा मी तुला पहावे असे वाटले
तुला खरेतर नकोच होते नाव ही माझे
उखाण्यात जे तुझ्या असावे असे वाटले
मृगजळ म्हणजे काय असे ते कळले तेव्हा
शोधत गेलो तुझे विसावे असे वाटले
मयुरेश साने

पुन्हा कसा टवटवीत झालो
तुझेच श्रावण भरून प्यालो
असा कसा मी तुझा निघालो
मला सुधा मी तुझा म्हणालो
जरा बसा म्हटले दु:खांना
सुखे म्हणाली आलो आलो
नवल असे काय त्यात आहे
तुझाच होतो तुझाच झालो
रिते रिते वाटलेच नाही
जसा जसा दु:खात बुडालो
गहिवरताना रहाट झालो
डचमळ डचमळ तुला मिळालो
कसे तरी हासतोय खोटे
स्वत:तुनी मी दूर पळालो
मयुरेश साने

एकटेपण आपले वाटे मला
होउ दे आता जरा माझे मला
कर्ज स्वप्नांचे तुझ्या फेडू कसे
आठवांचे तू दिले खाते मला
दोन भुवयांच्या मधे जे रेखले
पाहिजे होते तसे नाते मला
जीवना रे श्वासश्वासांच्या मधे
रोज दळते हे तुझे जाते मला
ऐकण्यासाठी मना तू कान हो
एकटेपण तेवढे गाते मला
.....मयुरेश साने

कोण कुठल्या सोबतीचे
श्वास नाही खातरीचे
हा खरा सिद्धांत आहे
जन्म सारे काळजीचे
हीच मिळकत जीवनाची
चार खांदे पालखीचे
शोध घेताना सुखाचा
दुखः झाले ओळखीचे
गोठले डोळ्यात अश्रू
प्रेम इतक्या तालमीचे
................................