Sunday, September 30, 2012

का तिला इतका बिलगतो पावसाळा

पावसा रे हा तुझा भलताच चाळा
का तिला इतका बिलगतो पावसाळा

मळभ इतकी कोठुनी घेऊन येतो
कूळ काळे पावसाचा जन्म काळा

हा ॠतू आहे निसरड्या पावलांचा
मग कशाला सभ्यतेचे नियम पाळा

खेळ पट्ट्यांनाच तो भिजवून जातो
शेतकी साठी कितीही जीव जाळा

दाटतो अलगद तिच्या डोळ्यामधे अन्
ओलसर करतो मनाचा पोटमाळा

...........मयुरेश साने....

अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे

मरण माझेच आयुष्यात माझ्या रोज डोकावे
अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे

सुखे असतील जर कोठे मला भेटू नका आता
कशाला मी तिचे व्हावे व्यथेशी गोड बोलावे

असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे

उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती आता माझे कसे व्हावे

मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे

...मयुरेश साने

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते

एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते

खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते

काळजाचा एक गहिवर अश्रू बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते

मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला कित्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने

खूप रडलो बस अता मी रडत नाही

दुख्ख आता पापणीला छळत नाही
खूप रडलो बस अता मी रडत नाही

शेवटी उरली तिजोरी बंद दुख्खे
ठेव सौख्याची मला परवडत नाही

जन्म अख्खा वाहण्यासाठीच नसतो
आसवांना एवढेही कळत नाही

धुगधुगी हरवून बसला कोळसा की
पेटवावा लागतो तो जळत नाही

वाटते कमळा प्रमाणे मी फुलावे
राहणे चिखलातले पण मळत नाही

जीवनाची सावकारी काय सांगू
हात जोडा पाय पकडा टळत नाही

.....................................मयुरेश साने
समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता.


पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता

....................................मयुरेश साने 

जीवनाची कैफियत कोणा पुढे मांडायची

न संपणारे प्रश्ण त्याची उत्तरे मी द्यायची
जीवनाची कैफियत कोणा पुढे मांडायची

जे जसे होते तसे मी निमुट स्वीकारायचो
जाणून होतो शेवटाला राख आहे व्हायची

आपले परके कुणाचा सोसही नव्हता मला
स्वाभिमानी दुख: माझी अश्रू सांभाळायची

जेवढे जमले मला मी तेवढा झालो तुझा
सांग किंमत जीवना मी कोणती मोजायची

मी तसा नाजुक मनाचा अन् तुझे न्याहाळणे
हरएक श्वासाला अता माझी दखल मी घ्यायची

.................................................................मयुरेश साने

आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी

पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे

साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे

.... मयुरेश साने